पत्नीच्या माहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपाचा कसा परिणाम होतो एखाद्याच्या संसारावर…

मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती  आज आपण पाहणार आहोत अभिनव बसवर सरांचा एक अप्रतिम लेख.. आवडला तर नक्की शेअर करा …

नवीन लग्न झालं. त्याने भाड्याने फ्लॅट घेतला. आईवडील गावाकडे. राजाराणीचा संसार सुरू झाला. ती नोकरी वगैरे करत नव्हती. त्याने तिला त्याबद्दल सुचवून पाहिलं पण तिला त्यात फारसा रस नव्हता. रात्री जेवण झालं की तिच्या घरच्यांचा फोन यायचा आणि ती तासंतास फोनवर बोलत बसायची. त्याला आश्चर्य वाटायचं की दररोज नेमकं असं नवीन बोलण्यासारखं असतं तरी काय. सुरुवातीला त्याला वाटायचं की आईवडिलांपासून लांब राहतेय म्हणून होत असेल पण दररोज तेच घडायचं. ती सगळ्या गोष्टी आईला फोनवर सांगायची.

कधीकधी दोघांमध्ये छोटे मोठे रुसवे फुगवे ,वाद व्हायचे ते देखील सांगायची. आई फोनवर सांगेन तसं नात्यात वागायची. आई म्हणाली २ दिवस बोलूच नको तर बोलायचीच नाही. आई म्हणाली संध्याकाळी स्वयंपाक बनवूच नको, बरोबर नवरा वठणीवर येईल, की बनवायचीच नाही. त्या संध्याकाळी तो ऑफिसमधून वैतागून आला. ऑफिस पोलिटिक्स मुळे त्याला विनाकारण बॉसचा ओरडा खावा लागलेला. इकडे घरात ४ दिवसांपूर्वी झालेल्या छोट्या वादाचा तिने अजूनही अबोला धरलेला. जेवण देखील बनवलं नव्हतं. आधीच मनस्थिती ठीक नसताना भुकेने तो अजूनच चिडचिड करू लागला.

ती देखील उलट बोलायला लागली. तिने बेडरूमचं दार लावून घेतलं आणि झोपून गेली. दुसऱ्यादिवशी तो ऑफिसला निघून गेला. तो जाताच ती माहेरी निघून गेली. याने फोन केले तर उचलेना. शेवटी तो मोठ्या भावाला घेऊन तिच्या घरी गेला. तिथे तिच्या घरच्यांनी त्याच्यावरच आरोप करण्यास सुरुवात केली. दोघांतील ज्या गोष्टी सांगायला नको होत्या त्या देखील तिने सांगितलेल्या. कोणत्या गोष्टींच स्पष्टीकरण द्यावं त्याला कळेना. आम्हाला विचार करायला वेळ हवाय, त्यानंतर आम्ही आमच्या मुलीला पाठवायचं की नाही ते ठरवू असं म्हणून तिचे आईवडील उठून गेले.

तो घरी आला. भकास घरात एकटाच बसलेला. किचनकट्ट्यावर सगळं खरकटं पडलेलं. राजा राणीच्या संसाराची त्याने पाहिलेली स्वप्ने त्याने त्या खरकट्यासारखी सुपलीत भरण्यास सुरवात केली, डस्टबिनमध्ये फेकण्यासाठी…

– अभिनव ब. बसवर
………………..
आवर्जून शेअर करू शकता. फोटो प्रतिकात्मक आहे.

टीप- हा एक प्रसंग असून त्यात त्या मुलीच्या व मुलाच्या पात्राबद्दल लिहिलं आहे. सर्व मुलींबद्दल नाही. त्यात कुठेही सर्व मुली अशाच करतात असा उल्लेख नाहीये. व्यक्ती तितक्या प्रकृती.

2 Comments on “पत्नीच्या माहेरच्या लोकांच्या हस्तक्षेपाचा कसा परिणाम होतो एखाद्याच्या संसारावर…”

  1. पत्नीच्या माहेरची माणसे आणि त्यांचा हस्ताशेप’ हाच अगदी बुरसटलेल्या विचार आहे…पतीच्या माहेरच्या म्हणजेच त्याचा आई वडीलाचा काही हस्ताशेपच नसतो का संसारामध्ये. जर मुलाच्या आई ने फोन केला तर ती काळजी आणि तेच मुलीच्या आईने फोन केला तर ती शिकवते..हे चुकीचं आहे..शेवटी त्यांनी देखील त्यांच्या लेकीला गेली २० २२ वर्ष सांभाळलेले आसते..लग्न करून दिले म्हणजे तिच्याशी सगळे नाते टोकून टाकायचे का मग त्यांनी..

  2. लेख अप्रतिम आहे..
    परवानगी असेल तर youtube वर प्रकाशित करूया, with voice.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *