जानकी बाई घरकुल या वृद्धाश्रमात पोळ्या करायला जायच्या. जानकी बाईंना रोज सकाळच्याच पोळ्या असत. साधारण साठ ते सत्तरच्या आसपास एवढ्या पोळ्या पुरत असत. कारण कोणी एक खाई तर कोणी कधीतरी दोन खात असत. संध्याकाळी बरेच जण तसही फलहारच करत तर अगदी काही जण भात खात असत.
म्हणजे थोडक्यात जानकी बाईंचे एक वेळेचं कामावर जाऊन भागत असे. तर आजही जानकीबाई नेहमीप्रमाणे पोळ्या करायला आल्या खऱ्या पण नेहमीची तरतरी त्याच्या चेहऱ्यावर नव्हती. वृद्धाश्रमाच्या संचालिका बाईंच्या ते लक्षात आलं, की त्यांनी जानकीबाईंना विचारलं की त्यांच्या मूडऑफच कारण. जानकी बाईंनी पदर डोळ्यांना लावला आणि म्हणाल्या, लेकाला सांगितलं की आज एक दिवस इथल्या सगळयांना पोळ्यांना छानपैकी तुप लावून देते.
तशाही रोज कोरड्या आणि पांढरटच पोळ्या खातात ही मंडळी. जर तुपाचा जो काही खर्च होईल तो देशील का? तर तो त्याचेच खर्च मला ऐकवू लागला. मलाही माहितीये तो एका पतपेढीत एक शिपाई आहे. त्याची बायको घरी शिवणकाम करून संसाराला थोडाफार हातभार लावते आणि मला इथे जे काही मिळतात ते. आमची तशीही मारामार असतेच गरजा भागवायची. पण म्हटलं एखादा दिवस जरा काय हरकत आहे तुपाचा खर्च करायला.
इतकं बोलून परत जानकी बाईंनी डोळ्याला पदर लावला आणि कसलासा खमंग आणि गोडसर वास त्यांना स्वयंपाक घरातून आला. जानकी बाईंनी प्रश्नार्थक संचालिका बाईंकडे बघितले. त्या हसल्या आणि खुणेनेच त्यांना स्वयंपाक घरात जायला सांगितले. जानकी बाई घाईतच आत गेल्या आणि हबकल्याच, आपल्या लेकाला, सुनेला आणि कॉलेज शिकणाऱ्या नातवाला तिथे बघून. सून आणि नातू प्रत्येक ताटात पोळी, अहं पुरणपोळी वाढत होते आणि लेक प्रत्येक पोळीवर तुप वाढत होता.
कोणाला तुप, कोणाला दूध आणि कोणाकोणाला तूप आणि दूध दोन्हींही हे आधी विचारून ताटे वाढली जात होती. दूध हवं असणाऱ्यांच्या ताटात दूध भरलेली वाटीही होती. जानकी बाई पुरत्या आता भांबावल्या होत्या. आपल्या गोंधळलेल्या आईकडे पाहून दिलखुलास हसतच लेक आईजवळ गेला. तोपर्यंत संचालिका बाई जानकी बाईंच्या पाठीमागे येऊन उभ्या राहिलेल्या.
त्या म्हणाल्या, जानकी बाई अहो मला कालच तुमच्या लेकाचा फोन आला होता आणि त्याने मला सांगितलं होतं तो हे सगळं घेऊन आज इथे येणार आहे. तुम्हाला काहीही न सांगण्याची त्याने मला विनंती केली होती. जानकी बाईचा लेक त्यांच्याकडे बघत बोलू लागला. आई अगं तु तुपाबद्दल बोललीस तेंव्हाच अगदी माझ्या मनात आलं होतं की तुपासोबतच पुरणपोळी हवीच. पण म्हटलं तुला जरा धक्का द्यावा. म्हणून मग तुला जमणार नाही म्हणालो आणि खर्चाचे पाढे वाचले तुझ्यासमोर. अरे पण जे खर्च सांगितलेस ते खरेच होते ना. मग आता एवढा खर्च इथे झाल्यावर तिथे कसे काय भागवायचे.
अगं आपल्या घरापासून दोन गल्ल्या सोडून तो नवा टॉवर झालाय ना तिथे मला रात्रीची सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी मिळतेय, रात्री आठ ते सकाळी आठ. बाराशे तरी सुटतील तिथून. म्हणजे सकाळी तु नऊ ते चार पतपेढीत काम करणार, घरी येऊन सुनेने शिवलेली कापडे लोकांकडे पोहचती करणार ते सहाला घरी येणार आणि पुन्हा आठला रात्रीच्या ड्युटीला जायला घराबाहेर पडणार. अरे इतका ताण नको रे घेऊन. अगं आई तुझी कुठलीही इच्छा अपुरी राहू नये म्हणून मधल्या सहा ते आठ वेळेतही कुठे काय मिळतेय का ते बघतोय.
जानकी बाईंनी डोळे वटारत लेकच्या दंडावर जोराची चापटी मारली. सुनेने आणि नातवाने आत्तापर्यंत वाढलेली ताटे टेबलवर नेऊन ठेवलेली. सगळी मंडळीही एक एक करून येत जागेवर बसलेली. ताटात पुरणपोळी पाहून खुलेलली, टेबलावर मांडलेल्या खुर्च्यांपैकी मधली खुर्ची मात्र अजूनही रिकामीच होती. कोणीच तिथे बसले नव्हते समोर वाढलेलं ताट असूनही. जानकी बाईनी काहीतरी उमजून फक्त पाहिलं लेकाकडे आणि लेकाने होकारार्थी मान हलवली.
जानकी बाईंनी पुन्हा डोळ्याला पदर लावला आणि त्या रिकाम्या जागेवर जाऊन बसल्या. नेहमी प्रमाणे वदनी कवळ घेता म्हणायला उठलेले एक आजोबा सगळ्यांना उद्देशून म्हणाले. आपल्या सगळ्या लोकांतून खऱ्या अर्थी सगळ्यात श्रीमंत अशा जानकी बाईंना खुप खुप शुभेच्छा. आजच्या जेष्ठ नागरिक दिनाच्या आणि त्यांच्या लेकाकडील ही मनाची श्रीमंती त्याच्या लेकातही म्हणजे जानकी बाईंच्या नातवातही अर्थातच उतरली असेल. म्हणून जानकी बाईंच्या सुनेचही आत्ताच अभिनंदन करतो. तिच्या नशिबी पुढे कधीही वृद्धाश्रम नाही म्हणून. इतकं बोलून रोज खणखणीत आवाज लावणारे आजोबांनी आज काहीशा दाटल्या अवाजातच वदनी कवळ घेता सुरू केलं होतं. धन्यवाद.