गणेशोत्सवाची आपण सगळेच आतुरतेने वाट पाहात असतो. आता तो उत्सव अगदी जवळ येऊन ठेपला आहे. आपल्या हिंदू परांपरानुसार गणपतीची पुजा ही आद्य मानली जाते. सर्व कार्याची सुरुवात ही गणेश पूजनानेच होते. गणपतीला दूर्वा प्रिय आहेत असे मानले जाते व ते खरेही आहे. त्याला रोज एक दुर्वांची जुडी वाहा व त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल.
गणपतीला दूर्वा का प्रिय याची पुराणात एक कथा सांगितली आहे. पूर्वी अनलासुर नावाचा राक्षस होता. तो ऋषि व मुनींना त्रास देत असे. देवतांनी गणपतीला विनंती केली. अनल म्हणजेच अग्नि. गणपतिने या अनलाला म्हणजेच राक्षसाला गिळून टाकले. त्यामुळे त्याच्या पोटात आग आग होऊ लागली. तेव्हा 88,000 मुनींनी प्रत्येकी 21 या प्रमाणे हिरव्या गार दूर्वा गणपतीच्या डोक्यावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी तर दुर्वाच्या 21 जुडया गणेशास खावयास दिल्या. या उपायाने गणपतीच्या पोटातील आग व जळजळ खूप कमी झाली. त्यावेळी प्रसन्न होऊन गणराज म्हणाले की जो कोणी मला दूर्वा वाहिल त्याला हजारो यज्ञ , व्रत, दानधर्म व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल. तेव्हापासून गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात.
या दूर्वा ज्या आपण विघ्नहर्त्याला वाहतो त्या आरोग्यासाठी गुणकारी आहेत. त्यात कॅल्शियम, फायबर, फोस्फरस, प्रोटीन मुबलक प्रमाणात असतात. जाणून घेऊया त्याचे फायदे :
डायबेटीस वर उत्तम: दुर्वांपासून हायपोग्लायस्मिक परिणाम साध्य करता येतो असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. म्हणून अशा रुग्णानी दुर्वांचा रस नियमित सेवन करावा असा सल्ला डॉक्टर देतात
लघवीमधील जंतुसंसर्ग: मुख्यतः स्त्रियांमध्ये लघवीमधील जंतुसंसर्गाचे प्रमाण अधिक असते. यावर दुर्वा गुणकारी आहेत.
रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी: आपले शरीर निरोगी व बळकट होण्यासाठी दुर्वा मदत करतात. दुर्वांमधील पोषक अशी जी गुणकारी तत्व आहेत ती रोगप्रतिकारक शक्ति वाढवायला मदत करतात व अनेक रोगांना आपल्यापासून दूर ठेवतात.
उत्तम पचंनासाठी दुर्वा लाभदायक : अनियमित खाण्याच्या सवयीमुळे हल्ली सर्वांना पोटाच्या तक्रारीचा सामना करावा लागतो. दुर्वांच्या रसाच्या सेवनाने अपचनाचा त्रास कमी होऊन पचनक्रिया सुधारते. नियमित दुर्वांच्या रसाच्या सेवनाने आम्लपित्ताचा त्रास कमी होऊन शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात.
दातांसाठी व मुख आरोग्यासाठी उपयुक्त: दुर्वांमध्ये फ्लवोनाईडस या घटकाचा समावेश असतो, त्यामुळे अल्सरचा त्रास कमी होतो त्याचबरोबर हिरड्यांचे आरोग्य सुधारते व तोंडाची दुर्गंधी दूर होते.
रक्त शुद्धीसाठी उपयोगी : दुर्वा नैसर्गिकपणे रक्त शुद्ध करतात. दुर्वांच्या सेवनाने इजा, जखमा, व मासिक पाळीच्या वेळी होणारा अतिरिक्त रक्तस्त्राव नियंत्रित होतो. शरीरातील लाल पेशींचे प्रमाण दुर्वांच्या सेवनाने वाढून हिमोग्लोबीन नियंत्रित राहते व अशक्तपणा राहत नाही.