दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ते परराष्ट्र मंत्रि, असा होता सुषमा स्वराज यांचा जीवनप्रवास…

भाजप नेत्या सुषमा स्वराज यांचे आज रात्री नऊ वाजता हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र स्वराज यांचे रात्री साडेदहाच्या सुमारास दुःखद निधन झाले.

सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरियाणाच्या अंबालामध्ये झाला होता. त्यांनी अंबाला छावणीच्या एसडी कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर पंजाब विद्यापीठातून एलएलबीची डिग्री मिळवली. यशस्वी राजकारणी, कुशल संसदपटू आणि उत्तम प्रशासक असा त्रिवेणी संगम असलेल्या सुषमा स्वराज या पेशाने वकील होत्या. सुषमा यांचा विवाह 13 जुलै 1975 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील स्वराज कौशल यांच्याशी झाला. त्यांना बांसुरी नावाची कन्या आहे.

सात वेळा खासदार आणि तीन वेळा आमदार अशी त्यांची कारकिर्द होती. 2009 ते 2014 या काळात त्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा एनडीएकडून पंतप्रधानपदासाठीचे नाव जाहीर झाले नव्हते, तेव्हा स्वराज यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होती. राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप-1 सरकारमध्ये त्या 26 मे 2014 ते 30 मे 2019 या काळात परराष्ट्रमंत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यानंतर या पदावर नियुक्त झालेल्या त्या दुसऱ्या महिला मंत्री होत्या. स्वराज यांच्या नावे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचा भार पेलल्यानंतर 2019 साली मात्र सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय जनता पक्षाबरोबर अखेरपर्यंत निष्ठावंत राहिलेल्या सुषमा स्वराज यांनी पक्षातील दिग्गज नेत्यांना साथ देताना स्वतःच्या कर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला होता. स्वराज यांच्या निधनाबद्दल राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक तसेच सर्व क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केला शोक.

Leave a Reply

Your email address will not be published.